मिरजेत खराब रस्त्यांचा पॅचवर्क-डांबरीकरणाने निषेध प्रणव बिल्डकॉनचा सर्वपक्षीय आंदोलनाला असाही पाठिंबा
Pranav Buildcon | 10 Dec 2022Total Views : 783मिरजेत खराब रस्त्यांचा पॅचवर्क-डांबरीकरणाने निषेध
प्रणव बिल्डकॉनचा सर्वपक्षीय आंदोलनाला असाही पाठिंबा
मिरज,ता.१० ः येथील खराब रस्त्यांविरोधात सुरु असलेल्या सर्वपक्षीय आंदोलनास पाठिंबा म्हणून आज प्रणव बिल्डकॉनचे संचालक किशोर पटवर्धन यांनी सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्याचे पॅचवर्क करून सकारात्मक आंदोलन केले. शहरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. सर्व शहरच धुळीने माखले आहे. याकडे शासन यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी समाजातील विविध पक्ष-संघटनांचे प्रतिनिधी, विविध स्तरातील व्यावसायिक आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर आले आहेत. बांधकाम व्यावसायिक पटवर्धन यांनी मिरजेतील चक्री सडकेचे पॅचवर्क करीत अनोख्या पध्दतीने निषेध नोंदवला.
माजी नगरसेवक सुरेश आवटी, भाजप नेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामास प्रारंभ झाला. यावेळी नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रेंगाळले आहे. या मुख्य रस्त्यांसह शहरांतर्गत अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्याविरोधात आंदोलन सुरु आहे. त्याला पाठिंबा म्हणून श्री पटवर्धन यांनी कमानवेस ते ऑक्सिजन पार्क या रस्त्याचे सुमारे अर्धा किलोमीटर अंतराचे पॅचवर्क व डांबरीकरण काम स्वखर्चातून सुरु केले आहे. सध्या या ठिकाणी प्रणव बिल्डकॉन डेव्हलपर्सतर्फे अर्बन रिपब्लिक टाऊनशीप हा गृहनिर्माण प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पातील सर्व रस्ते तसेच ऑक्सीजन पार्कच्या मुख्य रस्त्याची बांधणी प्रणव बिल्डकॉनने यापूर्वी केली आहे. आता या प्रकल्पाकडे येणारा रस्ताही ते स्वखर्चातून करून देत आहे. शहराचा चेहरा बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रामाणिक प्रयत्न हवेत. त्यांना या शहरातील व्यावसायिकांनी सकारात्मक बळ दिले पाहिजे. लोकांची आंदोलनामागची भूमिका समजून घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली पाहिजे अशी अपेक्षा श्री पटवर्धन यांनी व्यक्त केली.