नांदरूख एक विलोभनीय वडवर्गीय (Indian ficus) वृक्ष
Pranav Buildcon | 10 Apr 2023Total Views : 915
नांदरूख एक विलोभनीय वडवर्गीय (Indian ficus) वृक्ष
अस्सल भारतीय असा नांदरूख वृक्ष काही नवीन नाही, आॅक्सीजनची खाण, पक्षांचं आश्रयस्थान, अत्यंत कमी पाण्यावर येणारा त्यामुळे दुष्काळी भागात हमखास दृष्टीस पडणारा आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण करणारा असा हा देखणा आणि बहुगुणी वृक्ष.. उघड्या-बोडक्या दुष्काळी माळावर ताडमाड उंच, चारी बाजूला वाढलेलं एकुलतं एकांडं झाड दिसलं की ओळखायचं की हा साधूपुरूष नक्की नांदरूखच असणार..
नांदरूख ही वडाचीच पोटजात आहे पण वडामध्ये जे दुर्गुण आहेत ते यात नाहीत, जसे की वडाचे झाड उंच वाढतचं पण पारंब्यांमुळं त्याची वाढ चौफेर-चारी बाजूला होते, त्यामुळं आसपासच्या बिल्डींग स्ट्रक्चर्सना खासकरून फौंडेशनला धोका निर्माण होऊ शकतो वडाच्या या उपद्रवामुळे सार्वजनिक रस्ते वगळले तर वडाची झाडे खाजगीरीत्या हौसेने लावायला कुणी धजावत नाही.. अगदी त्याविरुद्ध नांदरूखला पारंब्या सुटतात पण त्या जमिनीत न जाता हवेतच तरंगत राहतात त्यामुळे आसपास अनियंत्रित वाढ न होता झाडाचा विस्तार आटोपशीर राहतो त्यामुळे एकंदर खूप सुंदर डौलदार ट्री स्ट्रक्चर निर्माण होते.. वडाची पान जरा राठ असतात तर नांदरूखची पानं गोल आकाराची आणि कायम टवटवीत, वडाची फळं मातकट लाल रंगाची तर नांदरूखची फळं नारंगी रंगाची एकदम आकर्षक त्यामुळे पक्षांचे नंदनवनच त्यामुळे एकंदरच नांदरूखचे देखणेपण आणि मोल अनेक बाजूने वाढत जातं..
असा हा बहुगुणी नांदरूख एक पवित्र वृक्ष म्हणूनही ज्ञात आहे प.पु.संत तुकाराम महाराजांनी त्यांची गाथा याच नांदरूख वृक्षाखाली बसून लिहिली अशी अख्यायीका आहे..
या वृक्षाच्या सानिध्यात नेहमीच एक वेगळी चित्त-शांती लाभते आणि म्हणूनच आम्ही मिरजेच्या अर्बन रिपब्लिक टाऊनशीप मधल्या आॅक्सीजन पार्कमधील विश्रांतीस्थानाच्या (Informal seating area) मधोमध तीन नांदरूखची झाडे समुहानं लावली आहेत..
घरी देखील मी नांदरूखचे झाड हौसेनं एका मोठ्या पाॅटमध्ये बुद्धाच्या पुतळ्याजवळ लावले आहे..
खरतरं सगळ्याच झाडांची छाया एक छान अनुभुती देत असते पण नांदरूखचं सानिध्य आणि ममत्व काही औरच आहे..
किशोर पटवर्धन, cnmd,
प्रणव बिल्डकाॅन प्रा.लि.
अर्बन रिपब्लिक टाऊनशीप,
मिरज..